*आम्ही जगायला जातो*
माणदेशी मेंढपाळांच्या चित्तथरारक जगण्याच्या संघर्षाची कहाणी
@लेखन-विजय भास्कर लाळे@
ही हकीकत आहे सांगली, सातारा,सोलापूर जिल्ह्यात सामावलेल्या माणदेशातल्या मेंढपाळ लोकांची दुष्काळी माणदेशातले हे मेंढपाळ पिढ्यानपिढ्या, वर्षानुवर्षे आपला भाग सोडून परमुलखात 'जगायला जातात. बायका पोरां सह, घरदार, शेती सोडून शेळ्या-मेंढ्यांच्या संगतीनं जगायला जातात. एक तर कोकणात जातात किंवा पूर्वेला धुळे-मूर्तिजापूर भागात केवळ आपल्याला दोन घास खायला मिळेल आणि मुक्या शेळ्या-मेंढयांसारख्या प्राण्यांना चारा मिळेल या आशेनं. दरवर्षी कार्तिक महिना सुरू झाला, की हे लोक वैराण माणदेश सोडून जातात आणि परत येतात ते आषाढ सरल्यानंतर आपल्या भागात मृगाचे थेंब घेऊनच. काळ बदलतोय, माणसं बदलतायत, जुन्या मेंढरांचे खांड जाऊन नवीन मेंढरं येतायत. पण पोटामागं पळत जगायला जायची परंपरा आजही चालू आहे. माणदेशाच्या साहित्यात, इथल्या वर्तमानपत्रात, इथल्या राजकारणात, समाजकारणात अनेक वेळा दुष्काळाबद्दल आणि इथल्या 'जगायला जायच्या व्यथेबद्दल अनेकांनी राज्यकर्त्यांच्या जाणिवा जागृत केल्या, पण त्यातून सुटका नाही.
यासर्व पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील शेंडगेवाडी या गावच्या काही मेंढक्यांबरोबर डिसेंबरच्या शेवटच्या आठ वड्यापर्यंत यावर्षी 'जगायला' जाण्याचा ज्वलंत अनुभव घेतला. शेंडगेवाडी या तीनशेच्या आसपास लोकसंख्या असलेल्या गावातले ८० टक्के लोक जगायला जातात असा हा त्या गावातील एकमेव पदवीधर कैलास गोविंद शेंडगे यानं सांगितल्यावरून मेंढपाळांचा जगण्याचा मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला. यावर्षी शेंडगेवाडी गावातले मेंढपाळ लोक इस्लामपूर-कऱ्हाडमार्गे कोकण पट्ट्याकडे निघाले आहेत. नेलकरंजी-भिवघाट-करंजे पेड़-हातनूर या मार्गे ते पुढे सरकत आहेत. हातनूर (ता. तासगावच्या डोंगरात मेंढके मुक्का माला आहेत, असा निरोप मिळताच एअरबॅग भरून मी तिकडे निघालो. खानापूरहून एसटीने हातनूरला गेलो तर तिथं मेंढके लोक हातनोली ला गेल्याचं समजले. हातनूर ते हातनोली दिवसाकाठी एकमेव असणारी एस. टी. नुकतीच गेली असल्यानं साडेचार ते पाच किलोमीटर अंतर पायी जावं लागलं. जाताना एक जाणवलं. हिरवा चारा या भागातही नाही. यावर्षी कमी पावसामुळे या भागातही पडीक जमीनच दिसत होती. मेंढपाळांना यावर्षी इकडे ही चाऱ्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. कमी पावसाने दक्षिण महाराष्ट्र वाळून गेल्याने माणदेशच्या मेंढपाळांना यंदा लवकरच घाट उतरून कोकणात जावे लागणार असल्याचे तिथे आलेल्या शेंडगेवाडी (ता. आटपाडी) च्या श्रीमंत दगडू शेंडगे या पंचविशीतल्या मेंढक्याने सांगितले. त्याच्याबरोबर मेंढ्या चारण्यास जाताना अत्यंत हृदयद्रावक प्रसंग आला. पडीक जमिनीवरसुद्धा मेंढपाळांना मेंढ्या चारू दिल्या जात नाहीत. यावर्षी या परिसरात पाऊस कमी पडल्याने गाववाल्यांनी तिथला संपूर्ण भाग स्वतःच्या जनावरांसाठी राखीव ठेवला होता. त्यामुळे दरवर्षी त्या भागात जाणाऱ्या मेंढपाळांना यावर्षी हुसकून लावण्याचे प्रकार बहुतेक ठिकाणी आढळले. पुढे कुठे जायचं यावर जिथं चारा भेटेल तिकडं जाणार असं उत्तर मिळालं.
आम्ही पुढे इस्लामपूरमार्गे कहाडचा सुर्ली घाट उतरून कृष्णाकाठी पोहोचलो. तिथं हिरवागार चारा, भरपूर पाणी, सगळीकडे संपन्नता आणि आल्हाददायक वातावरण. उन्हाचा भगाटा इथे फारसा नव्हता. कधी हमरस्ता, कधी कच्ची सडक, कधी डोंगरावर, कधी एखाद्या घळीतून असा प्रवास सुरूच होता. इथे आल्यानंतर मात्र मेंढपाळ जरा निश्चिंत दिसले.भरपूर चारा आणि पाणी यामुळे मेंढरं जरा आनंदी भासली. आता इथं काही काळ थांबून मेंढरं आणि आपला जीव जगवायचा असं मेंढपाळ लोक ठरवतात. एका पडीक जमिनीच्या तुकड्यावर मेंढरं चरत असताना एक हृदयद्रावक प्रसंग घडला. आम्ही मेंढ्या चरायला सोडून एका झाडाखाली गप्पा मारत बसलो असतानाच एक मध्यमवयीन बाई हातात भले मोठे दगड घेऊन मेंढरांना हुसकावत आमच्या दिशेने येताना दिसली. तिच्या तोंडाचा पट्टा चालू होता. मेंढक्यांनी तिचा पवित्रा लक्षात घेऊन आपापली मेंढरं दुसरीकडे वळवण्याचे काम सुरू केले. त्यात एका लहान मेंढक्याने त्या बाईला "का वो आक्का! का मारतायसा, अवलगामी लागलं. तर जीव जाईल त्येचा, असं मेंढरांना दगड मारू नका, ही पडीक जमीन दिसली म्हणून आम्ही मेंढरं सोडली, "अशी अगदी काकुळतीला येऊन हात जोडून विनवणी केली, तर ती बाई ओरडली, 'आरं मुर्दाडांनो, माणसं हैसा का जनावरं, हितं न्हाय मेंढरं चारायची, आरं दोडानू काल काय सांगटलं? आं? आधी हाला हितनं, काळधाडी न दुष्काळी, काय रं लापाट तुमची जात! कितीदा सांगायचं? तुमच्या पायगुणानं आमची पार राख झाली. नवरा गेला, पोरगा गेला. दावणीची म्हस गेली. ह्याज्या फुडं तुमाला आमच्या गावात मी न्हाय येऊ द्यायची! हाला आधी! असल्या गुणानं तर तुमाला देवानं आन -आन आणि पानी-पानी करायला लावलंय!'
माझ्या कानात एकदम कुणीतरी बंदुकीचा बार फोडतंय असं झालं. पण मेंढक्यांवर त्याचा काहीही परिणाम दिसला नाही.
ज्या दिवशी हा प्रकार घडला त्या दिवशी रात्री त्याच गावातल्या एका शेतकऱ्याच्या रानात मेंढरं बसवायचा करार झाला होता. दिवसभर फिर-फिरून चारून आणलेली मेंढरं खता साठी' रात्रभर किंवा आठवडाभराच्या रात्री सगळी मेंढरं एकत्र कोंडून बसवायची, ही मेंढ्यां चे खत खारपड (क्षारपड) रानाला चांगलं असतं म्हणून मेंढ्यांना बसवण्याची मागणी असते. मेंढी खताच्या बदल्यात मेंढपाळांना मेंढरांच्या हिशोबाने पैसे किंवा धान्य मिळते.
मेंढपाळ आपल्या गावातनं निघताना रोजच्या तेला मिठा पिठा लागेल आणि आवश्यक असेल तेवढेच समान घोड्यावर लादून मेंढ्या सह जगायला आलेला असतो. विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर असतं तसं मेंढपाळांचा बिऱ्हाड घोड्यावर असतं.आधी पोतं, त्यावर घोंगडं, नंतर स्वेटर आणि अंथरुणाचे कपडे, त्यावर लोकरी जेन, वाकळ, बुरनूस (ब्लॅकेट) हे सगळं घोड्याच्या पाठीवर आवळून बांधायचं, त्यावर मोठी दोन गोणी दोन्हीकडं दोन असायची (त्यात भांडीकुंडी भरून त्यावर वाघर, डांबाच्या काठ्या आणि त्यावर माचोळी. या माचोळीचा उपयोग शेतात मेंढरं बसवल्यानंतर तिथंच थाटलेल्या संसारात 'सेल्फा सारखा होतो. तर माचोळीवर पाय बांधून कोंबड्या उलट्या टांगतात. तिथंच लहान कोकरं (दोन किंवा जास्तीत जास्त तीन) दोरीने माचोळीला 'फिट्ट करतात. डांबाच्या दोन्ही बाजूच्या काठ्यांना पिशव्या अडकवायच्या आणि कोकरांना ऊन वारा-पाऊस लागू नये म्हणून कापडाचा फरा पांघरायचा. माचोळीच्या उरलेल्या जागेत पाण्याची घागर उपडी टाकायची आणि लहान मूल असले तर घागरी च्या बुडाचा आधार देऊन पुढे बेचक्यात पाय खाली सोडून ठेवायचं. हे सगळं ओझं घोडं सहन करतं. एरवी चालताना बायका- लहान पोरं म्हातारी लोकं चालतच जातात घोड्या बरोबर दोन कुत्रीही पुढे- मागे असतात. या सर्वाच्या संरक्षणार्थ एकदा का मेंढरं एखाद्याच्या रानात बसवली, की तिथचं रहावं लागतं. लांडग्यांची भीती असतेच परंतु मटणाच्या आशेनं येणारे लोक, याशिवाय साप, विंचू यां सारख्या प्राण्यांपासूनही मेंढरांना जपता येतं. प्रत्येक ५० मेंढरांमागे एक मेंढका त्याच्या कुहाडी आणि कुत्र्यासह असावा लागतो. तरच नीट संरक्षण करता येते. एका खांडात किमान ७० ते १०० पर्यंत मेंढरं असतात. जिथं मेंढरांचं खांड बसवलं जातं तिथंच मेंढपाळांचा उघड्या वरचा संसार असतो. तिथंच तीन दगडांची चूल मांडून स्वयंपाक केला जातो. एका एकराच्या रानात किमान ६ खांड आणि वारा मेंढके आणि त्यांची बायका-पोरे राहतात. रात्री तीन-तीन तास पहारा देण्याचे काम प्रत्येक मेंढका आळीपाळीने जागून कटाक्षाने करत असतो. जरा जरी मेंढरांत हालचाल झाली तर तो सगळ्यांना सावध करतो. त्यावेळी त्याची कुत्रीही तिथंच असतात. सकाळी उठून उघड्यावरच आंघोळ उरकली जाते. आंघोळीच्या वेळी काळ्या रानाचा चिखल पायाला लागू नये म्हणून पायाखाली चिपाई आणि सिमेंटचं पोतं टाकून आंघोळ करतात. शेळ्या-मेंढयांना दूध असलं तर दूध काढतात नाही तर कोराच चहा घेऊन पुन्हा दुसरा दिवस सुरू होतो. सायंकाळी सात-साडेसातला बसवलेली मेंढरं सकाळी साडेनऊच्या सुमारास पुन्हा प्रत्येकाचे खांड वेगळे करून फिरवून चारून आणतात आणि सकाळी अकरा साहेअकराच्या दरम्यान पाण्यावर आणली जातात. रात्री सगळे खांड एकत्र करून त्या भोवती वाघर लावली जाते. सकाळी ती काढून टाकतात, मोठी मेंढरं चरायला गेल्यावर लहान ज्यांचे अजून दात उगवायचे आहेत अशी कोकरं ओझ्या शेजारीच बांधून ठेवतात. लहान कोकरांना मातेच्या दुधाव्यतिरिक्त गहू आणि हायब्रिड यांचे पीठ एकत्र करून त्याच्या बोट्या चारल्या जातात. शिवाय जे मेंढस दमाचं असेल आणि विकून पैसा करायचा असेल त्या मेंढरा ला पण ४ ते ५ महिने अशा बोटचा चारल्या जातात. गाभण मेंढ्यांना ज्वारी, बाजरी, गहू असे काहीही सकाळी चारायला नेण्यापूर्वी पाठीत घालून चारतात. निसर्गाबरोबरच मानव निर्मित समस्याही माणदेशी मेंढपाळांना त्यांचं जगायला जाणं अवघड करून टाकतात. मेंढपाळांवर दादागिरी करून त्यांना नाहक त्रास देणान्यांची यादी खूप लांब करता येईल. रामोशी, दारुडे लोक, धनदांडगे, गावगुंड कारण नसताना भांडतात, मारतात आणि मेंढरू पळवून नेतात. मेंढरू हा अतिशय घाबरट प्राणी आहे. रात्री-अपरात्री लांडग्यांन किंवा माणसानं त्यावर झडप घालून नेलं तरी ते आवाज काढत नाही. मेंढरांना चोरून नेऊन लोक त्यांच्या जिभेत काटा रुतवतात, कान कापतात किंवा प्रसंगी कापून फडशा पाडतात. अशा वेळी एकटा-दुकटा मेंढपाळ काहीही करू शकत नाही. मेंढरांना विलायती बाभळीचा पाला आवडतो. शेतकरी लोक आपल्या रानाकडेच्या बाभळीच्या शेंगा आणि पालासुद्धा काही वेळा मेंढक्यांना पाहू देत नाहीत. वास्तविक शेतक ऱ्यांनी परवानगी दिल्यास विलायती बाभळीच्या झाडाला सवळून काढून पाला आणि शेंगा मेंढरांनी संपवल्यावर उरलेल्या फांद्या पेटं (ढीग) मारून मेंढपाळ ठेवतात. शेतकऱ्यांना ते जाळता किंवा विकता येते. काही शेतकरी लोक मेंढपाळाची कुऱ्हाड, त्याचे घोंगडे उगाच काही तरी कारणाने भांडवा काढून हिसकावून घेतात.
मेंढपाळ असे उघड्यावरचं जगणं भोगत असतो, त्याला किंवा त्याच्या कुटुंबातल्या लोकांना काही दुखलं, खुपलं, आजारी पडलं तर वैद्यकीय उपचारांची सोय नसतेच. शिवाय त्यांच्या श्रद्धा आणि अंधश्रद्धा फार विचित्र आणि भयानक असतात. तेल चोळ, हळद लाव, पाला बांध असले प्रकार असतातच. शिवाय भाकर उतरुन टाक, लिंबू उतरुन टाक, बिब्बा अडकव असले उपचार (!) ही केले जातात. मेंढरांनाही काही रोग झाला, आजार झाला तर मेंढपाळ लोक स्वतःच डॉक्टर बनता त, मेंढका हा सर्वात माहीतगार प्राणी असतो. एखाद्या ठिकाणात गेल्यावर पाणी कुठं आहे, ओढा, विहीर कुठं आहे, लवण कुठे आहे. दरी किती खोल आहे, डोंगर किती उंच आहे. औषधी वनस्पती कुठली, कुठे मिळेल. त्या भागातला श्रीमंत कोण, गरीब कोण, कुणाची किती जमीन, कुठली जमीन, कुठली माती कशी आहे एवढी सगळी माहिती त्याला पिढी जात मिळत असते. त्यात तो आणखी भर घालत असतो. या जगण्याच्या कलेत निसर्ग त्याला सर्व प्रकारे शिकवतो, असं म्हटलं तर वावगं ठरू नये. त्यामुळे मेंढपाळ स्वतःच हकीम किंवा वैद्य असतो. उदा. मेंढरू जास्त डरंगळत असेल तर तो केळीच्या सापटाचा चेवून रस पाजतो. मेंढी नुकतीच वेणा घालत असली तर शेपटीच्या वरच्या बाजूला तो डाग देतो. मेंढराला साप-विप चावला तर त्याचा कान कापून त्याचं रक्त घालवून देतो, त्यामुळे ते मेंढरू जगतं असं म्हणतात. लांडग्यान मेंढराला व्हलगाडलं (धरलं) तर किंवा लांडग्यानं मेंढरू ओलांडलं, त्याची सावली पडली, तर मेंढरू मरतं असा समज आहे. गर्भार मेंढीला गढूळ पाणी प्यायला लागलं तर मेंढी गाभडती (गाभ मरतो) तर कोकरू मरुनच पोटातनं येतं, असं मानतात. पायाचं दुक पोटात होतं, त्यामुळे मेंढरं काही खात नाहीत अशा आजाराला पोटा वर सळई तापवून डाग देतात. बकऱ्याला पडसं -खोकला आल्यावर तीन ठिकाणी डागतात, गळ्याच्या घाटीवर, छातीवर आणि शेपटी खाली.
जालिंदर हुबाळे व सुरेश लवटे यांनी माहिती दिली, 'आमाला कळतंय असं आमी मेंढरा मागं येतोय, धुळे, मुर्तिजापूर, सोलापूरच्या पार खाली किंवा कराडच्या पुढे कोळं, घारेवाडी, विंग आणि पाटणचे खोरं ओलांडून खाली जातो. आमाला शेती हाय. १०-१२ एकर पण आपल्या मानदेशात काय पिकतंय ओ! आता गव्हू, शाळू, येती वर्षाकाठी २-५ पोती. पण त्येनं काय चालणार? मग असं हिंडावं लागतंय, शेतीत वर्षाला २० हजार बी उत्पन्न नाय, पण मेंढरात लाखाचं उत्पन्न असतंय. एक मेंढरू सरासरी हजार-बाराशेचं असतं. प्रत्येकाच्या खांडात ५० च्या म्होरंच मेंढरं असत्यात. एखाद्या रानात मेंढरं बसवायला कृष्णाकाठाला मेंढरामागं किमान दीड ते दोन रुपये येत्यात, ही मेंढरं हीच आमची इस्टेट हाय, जिवंत इस्टेट!' "शाळेत का गेला नाही? दुसरा काही व्यवसाय, धंदा वगैरे मी पुन्हा विचारलं तेव्हा श्रीरंग शेंडगे या मेंढक्यानं उत्तरं दिलं. 'आमच्या डोईन् डोई, चरोन् चरा हाच धंदा आहे. शाळेचं म्हणाल तर आमच्या समाजातली पोरं लईत लई पाचवी सहावीपर्यंत शिकत्यात. एकदा का कळायला लागलं की बापाबरोबर मेंढरांमागे येत्यात, पोरींचं म्हणाल तर त्या बी आठवी-नववीच्या पुढं दम काढत नाहीत. लगीन होऊन सासरी जाऊन पुन्हा मेंढरामागंच यायला लागतंय त्यांला पण. आन मला सांगा, आमी असं हे वर्षाकाठी ८/८ महिने बाहेर फिरत असतो. मग शाळेत जाणार कवा आन् घालणार कुणाला? आपल्या माणदेशात पाऊस-पाणी असता, चारा-पाणी असतं, घरचं पिकत असतं, तर हो असलं लापटावाणी, मेंढरासारखंच का जगलू असतू? लोक पळवल्यात. गाडीखाली चेंगरून पुना आमालाच दम देत्यात, शिव्या देत्यात दारूडे लोक बाया-माणसांवर हात चालवत्यात, पण आता सवय झालीय कशाचंच काय वाटत नाय. कारण आमी जगायला आलोय ना!'
यावर काय बोलणार? नऊ हजार वर्षापूर्वी पासून मेंढीपालन होत होते, असं इतिहास सांगतो. तेव्हापासून मेंढपाळाचा प्रवास चालत आला आहे. सर्वसामान्यांच्या सभ्य समाजानं दुर्लक्षिलेला, हेटाळणी केलेला, प्रसंगी अन्याय, अत्याचार केलेला हा मेंढपाळ समाज. आता विज्ञानयुग आहे. मेंढीपालन क्षेत्रातसुद्धा अनेक क्रांतिकारक शोध लागलेत. ऑस्ट्रेलियात मेरिनो जातीच्या मेंढीच्या शरीरात इंजेक्शन टोचून त्वचेवरची लोकर गाळून पाडवली जाते. इतकेच नव्हे तर क्लोनिंगद्वारे 'डॉली नावाची मेंढी जगात सर्वप्रथम निर्माण झाली. पण माणदेशाच्या मेंढपाळ समाजाचे जगायला जाणे आजही सुरू आहे. एका आकडेवारी नुसार माणदेशातले ४० टक्के लोक असे जगायला जातात.
*****************
चौकट 1 *मोजके सुशिक्षित*
मेंढपाळांत सुशिक्षितांचे प्रमाण कमी असले तरी जे लोक आठवी, दहावीच्या वर जातात ते पदवी मिळवतात, घरची आर्थिक परिस्थिती ही शिक्षणासाठीची प्रमुख बाब आहे. आटपाडी तालुक्यातील दडसवाडी (उंबरगाव) या एक हजार लोकसंख्येच्या गावातले शिवाजी दशरथ पाटील यांनी आपल्या मामाकडे राहून मास्टर ऑफ व्हेटनरी सायन्स' ची पदवी घेतली. पुढे एम. पी. एस. सी. पास होऊन आता मुंबईत 'इन्कमटॅक्स अधिकारी म्हणून नोकरीत आहे. तसेच बिभिषण सत्याप्पा दडस याने आपल्या मोठ्या भावाकडे राहून 'बीएससी' पदवी संपादन करून आता आटपाडीत शेती खात्यात सुपरवायझर म्हणून आहे. या दोघांचेही आई-वडील मेंढपाळ आहेत.
###########
चौकट 2 *मेंढया अशा असतात*
माणदेशात 'माडग्याळ' जातीच्या काळ्या व पांढूरक्या पट्ट्या मेंढया पाळल्या जातात. कोकणातली मेंढरं देशी मेंढरं असतात, ती पूर्ण काळ्या रंगाची असतात. कोकणातली मेंढरं पावसाळा सोसतात, पण उन्हाळा सोसत नाहीत. त्याउलट माणदेशातली 'माडग्याळ' जातीची मेंढरं कितीही ऊन सहन करतात. मात्र पावसाळ्यात ती टिकत नाहीत. मेंढ्या ह्या मांस, कातडी आणि काही प्रमाणात दुधासाठी पाळल्या जातात. कोकणातल्या देशीपेक्षा माडग्याळ जातीच्या मेंढ्यांची बाजारू किंमत जास्त असते. मात्र कातडीसाठी म्हणून देशी वाण लोकरीसाठी काळीभोर म्हणून प्रसिद्ध आहे. माडग्याळ मेंढयांना देशीपेक्षा जास्त चारा आणि पाणी लागते, सर्व प्रकारच्या मेंढयांची आयुर्मर्यादा ७ ते ८ वर्षे असते. हा अत्यंत भित्रा प्राणी आहे. काही मेंढया तर लांडग्यांच्या हुंगण्यानेदेखील बेशुद्ध पडल्याची उदाहरणे आहेत. माडग्याळ जातीच्या मेंढयांना शिंगं नसतात, परंतु शिंगाच्या बकऱ्यांनादेखील नर मेंढया टक्करीला सरस ठरतात. १०० मेंढरां च्या खांडात दोन नर पाहिजेतच. मात्र शेरडं डाव्या खांडात जास्त नसावीत कारण शेरडं मेंढरांना ढुशा मारून जखमी करू शकतात. मेंढरांना सपाटीपेक्षा उंच पठारावर, डोंगरावर चरणे अधिक आवडते. मेंढ्याची लोकर वर्षातून दोन वेळा कातरली जावीच लागते अन्यथा त्यांच्या आरोग्यावर आणि वाढीवर परिणाम होतो.
##########
चौकट 3 *'बनगरवाडी' गाजली; पण*
माणदेशाचे थोर साहित्यिक व्यंकटेश माडगूळ करांनी मेंढपाळांच्या जगायला जाण्याच्या परंपरेवर कादंबरी लिहिली. १९५४ च्या दिवाळी अंकात (मौज) ती प्रसिद्ध झाली. त्यानंतर तिचे कादंबरीत रूपांतर १९५५ ला झाले. त्या बनगरवाडीने मराठी साहित्य जगतात प्रचंड मान प्रतिष्ठा मिळवली. महाराष्ट्रातल्याच नव्हे तर जगभरातल्या एकूण १३ भाषांत तिचे रूपांतर होऊन असंख्य वाचकांच्या पसंतीला उतरली. १९९९ ला बनगरवाडीची चौदावी आवृत्ती छापली गेली. पुढच्याच वर्षी 'बनगर वाडी'चा अमोल पालेकरांनी चित्रपट तयार केला. तोही गाजला. माणदेशातल्या मेंढपाळांचं 'जगायला जाणं सर्वत्र चर्चिले गेले. मेंढपाळां च्या या व्यथेशी सहानुभूती. करुणा, दया व्यक्त केल्या गेल्या, पण २१ व्या शतकाच्या पूर्वार्धात ही माणदेशातल्या मेंढपाळांचे 'जगायला जाणे सुरूच आहे.
@@@@@@@@@@@@@@@@@